आषाढी एकादशीनिमित्त विशेष रेल्वे गाड्या
प्रतिनिधी, लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र
आषाढी एकादशीनिमित्त वारकर्यांच्या सोयीसाठी रेल्वेकडून विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. नागपूर, पुणे, कलबुर्गी आणि कोल्हापूर येथून या गाड्या धावणार आहेत. त्यामुळे वारकरी आणि प्रवाशांची सोय होणार आहे.
दि. 6 जुलैरोजी पंढरपूर येथे आषाढी एकादशी पार पडणार आहे. यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी या ठिकाणी येत असतात. परंतु सध्या सुरू असणार्या रेल्वे गाड्यांवर याचा अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेकडून नागपूर-मिरज, पुणे-पंढरपूर-मिरज, मिरज-कलबुर्गी आणि कोल्हापूर-पंढरपूर-कुर्डुवाडी या जादा विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर ते मिरज ही गाडी दि. 4 व 5 रोजी नागपूर येथून सकाळी 8.50 मिनिटांनी सुटेल. ती पंढरपूर येथे दुसर्या दिवशी सकाळी 8 वाजता पोहोचेल, तर मिरजेत दुपारी 12 वाजता येईल. परतीच्या प्रवासात ही गाडी मिरजेतून 1 वाजता सुटेल, पंढरपूर येथे दुपारी 4 वाजता, तर नागपूर येथे दुसर्या दिवशी दुपारी 12.25 पोहोचेल.
पुणे-पंढरपूर-मिरज ही गाडी दि. 3 ते 7 जुलै दरम्यान पुण्यातून सकाळी 8.40 वाजता सुटेल, पंढरपूर येथे दुपारी 4 वाजता, तर मिरजेत सायंकाळी 6.45 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मिरजेतून रात्री 7.30 वाजता सुटेल, पंढरपूर येथे रात्री 10 वाजता पोहोचेल, तर पुण्यात दुसर्या दिवशी पहाटे 4.30 वाजता पोहोचेल. कोल्हापूर-पंढरपूर-कुर्डुवाडी ही गाडी 1 ते 10 जुलैदरम्यान धावणार आहे. ही गाडी कोल्हापूर येथून सकाळी 6.10 वाजता सुटेल, मिरजेत सकाळी 7.30 वाजता येईल, पंढरपूर येथे दुपारी 12.15 तर कुर्डुवाडी येथे दुपारी 1.30 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी कुर्डुवाडी येथून दुपारी 4.40 वाजता सुटेल, पंढरपूर येथे 5.30 वाजता, मिरजेत रात्री 8.20 वाजता येईल. कोल्हापूर येथे रात्री 10.30 वाजता पोहोचेल.
मिरज ते कलबुर्गी ही गाडीदेखील 1 ते 10 जुलैदरम्यान धावणार आहे. ही गाडी मिरज येथून पहाटे 5 वाजता सुटेल, पंढरपूर येथे 7.40 वाजता, सोलापूर येथे 11 वाजता, तर कलबुर्गी येथे दुपारी 1.30 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी कलबुर्गी येथून दुपारी 3.50 वाजता सुटेल, पंढरपूर येथे रात्री 8.55 वाजता, तर मिरजेत 11.50 वाजता येईल.
लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क
मोहसीन इसाक खान.
(८६०५१७१९१७).
रोहन हनुमंत हिवराळे.
( ८६६८६१००५०)
Comments
Post a Comment