उपसा सिंचनाबाबत महत्वपूर्ण बैठक पार पडली!
म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेशी संबंधित विविध मागण्यांबाबत आज जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मा. आमदार गोपीचंद पडळकर यांनी सिंचन योजनेच्या प्रलंबित कामांवर चर्चा करत तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
मुख्य ठराव आणि निर्णय:
१) म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेसाठी निधी उपलब्ध करणे –
प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकूण ५५० कोटी रुपयांची गरज असल्याचे नमूद करण्यात आले. यातील २७५ कोटींची पुरवणी मागणी चालू आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आली असून उर्वरित २७५ कोटी पुढील आर्थिक वर्षात तत्काळ उपलब्ध करून दिले जातील, असा निर्णय घेण्यात आला.
२) यांत्रिकी व विद्युत कामांची निविदा प्रक्रिया –
सद्यस्थितीत ७८% कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामांसाठी तातडीने निविदा काढण्याची गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले. यानुसार:
यांत्रिकी कामांसाठी ५० कोटी रुपयांची निविदा
विद्युत कामांसाठी ३८ कोटी रुपयांची निविदा
या निविदा एप्रिल २०२५ मध्ये काढण्यास मान्यता देण्यात आली.
३) तलाव भरण नलिकेच्या निविदा
म्हैसाळ विस्तारित जत योजनेतील गुरुत्वनलिकेची कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे तलाव भरण्याच्या निविदा पुढील सहा महिन्यांत काढण्याचे निर्देश देण्यात आले. निधी उपलब्धतेच्या आधारे या कामांना प्राधान्य दिले जाईल.
४) मूळ म्हैसाळ योजनेतून अतिरिक्त पाणीपुरवठा –
जत तालुक्यातील लोकवस्त्या आणि वंचित भागांमध्ये सिंचन सुविधा पोहोचवण्यासाठी अतिरिक्त नलिका टाकण्याची मागणी आमदार पडळकर यांनी केली. त्यानुसार, सविस्तर अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला देण्यात आल्या.
या महत्त्वपूर्ण बैठकीस आ. सदाभाऊ खोत, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. दीपक कपूर, महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. अतुल कपोले, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता श्री. हनमंत गुणाले, तसेच सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. चंद्रशेखर पाटोळे उपस्थित होते. या निर्णयांमुळे म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेच्या कामांना गती मिळेल आणि शेतकऱ्यांना अधिक चांगला पाणीपुरवठा उपलब्ध होईल.
लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .
मोहसीन इसाक खान
(८६०५१७१९१७)
रोहन हनुमंत हिवराळे
( ८६६८६१००५०)
Comments
Post a Comment