पंढरपूर ! अविष्कार २०२५’ मध्ये स्वेरीला घवघवीत यश ;
प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क (महाराष्ट्र)
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ स्तरीय ‘अविष्कार २०२५’ या संशोधन महोत्सवात उल्लेखनीय असे यश संपादन करून राज्यात स्वेरी महाविद्यालयाचा नावलौकिक आणखी वाढविला आहे. या निमित्ताने महाविद्यालयातील तब्बल पाच शोध प्रकल्पांची निवड ‘राज्यस्तरीय अविष्कार २०२५’ या स्पर्धेसाठी झाली आहे यामुळे यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दि. २९ व दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी सोलापूरातील व्ही. जी. शिवदारे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये ‘अविष्कार २०२५’ ही स्पर्धा पार पडली. या संशोधन महोत्सवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांतील ३९१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत पंढरपूरच्या स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी विविध गटांमध्ये विशेष चमकदार कामगिरी केली. रुक्मांगत मुकुंद उत्पात यांनी पदवी स्तरावर असलेल्या ‘अॅग्रीकल्चर अँड अनिमल हजबंडरी’ या गटात प्रथम क्रमांक मिळविला. गिरिजादेवी संतोष देशमुख यांनी पदवी स्तरावर असलेल्या ‘मेडिसिन अँड फार्मसी’ या गटात तृतीय क्रमांक मिळवला तसेच श्रद्धा भगवान गव्हाणे, हनुमंत पोपट बोराटे आणि मिथुन धवल शहा यांनी पदव्युत्तर स्तरासाठी असलेल्या अनुक्रमे इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, पीएच.डी. स्तर- इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि प्युअर सायन्सेस या गटात द्वितीय क्रमांक मिळवला. स्पर्धेच्या समारोप समारंभासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर तसेच बालाजी अमाईन्स लिमिटेड, सोलापूरचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या मान्यवरांकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले आणि त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे देण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांना पु.अ. हो. सोलापूर विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, स्वेरीतील संशोधन व विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ. अभिषेक एम. एस. आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालय स्तरावर आविष्कार २०२५ चे समन्वयक म्हणून डॉ. दिग्विजय रोंगे आणि प्रा. दिगंबर काशीद यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी महत्त्वाची भूमिका बजावून योग्य मार्गदर्शन केले. निवड झालेले प्रकल्प आता जानेवारी २०२६ मध्ये परभणी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ‘अविष्कार २०२५’ स्पर्धेत महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, संस्थेअंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, प्राध्यापक वर्ग, पालक, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व पालकांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन करून त्यांच्या संशोधन वृत्तीचे कौतुक केले आहे.
Comments
Post a Comment