सोलापूर महानगरपालिकेत भाजपाचा झेंडा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे अभिनंदन !
प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क (महाराष्ट्र)
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे पेढा भरवून अभिनंदन केले. या ऐतिहासिक विजयात योगदान देणाऱ्या भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी तोंडभरून कौतुक केले.
पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यापासून जयकुमार गोरे यांनी सोलापूर शहरातील रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करून त्यांनी संघटन मजबूत करत नवे सहकारी जोडले आणि जुन्या-नव्यांचा समन्वय साधत प्रभावी पक्षबांधणी केली.
महानगरपालिकेसाठी जिल्हा नियोजन समितीमधून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून शहरातील विविध विकासकामांना गती देण्यात आली. पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा यांसाठी आवश्यक निधी मिळवण्यात आला. तसेच रखडलेल्या विमानसेवेचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सोडवून विमानसेवा सुरू करण्यासह आयटी पार्क मंजुरीसाठीही ठोस प्रयत्न करण्यात आले.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आखलेल्या प्रभावी रणनीतीला आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे आणि भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी सक्रिय साथ दिली. या संघटीत प्रयत्नांमुळे भाजपाला सोलापूर मनपेत मोठा आणि निर्णायक विजय मिळाला.
प्रचार काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर शहरात सभा घेऊन विकासाचा स्पष्ट आराखडा मांडला होता. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून सोलापूरकरांनी भाजपावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत एकहाती सत्ता बहाल केली आहे.
महानगरपालिका निवडणुकीतील विजयानंतर शनिवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आभार मानले. यावेळी आगामी काळात सोलापूरची विस्तारित विमानसेवा, समतोल पाणीपुरवठा योजना, आयटी पार्क, एमआयडीसीतील पायाभूत सुविधा आदी सर्व विकासकामे मार्गी लावण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
Comments
Post a Comment