पंढरपूर; गोपाळपूर स्वेरीत विज्ञान प्रदर्शनाचे थाटात उदघाटन . विज्ञान ही जीवनाची गुरुकिल्ली बनली पाहिजे सोलापूर जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी प्रकाश नांगरे;
प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क (महाराष्ट्र)
पंढरपूर- ‘शासनाची ध्येय-धोरणे ही समाजाच्या उन्नतीसाठी असतात. विद्यार्थ्यांनी आपली सृजनशीलता वापरून नवनिर्मिती केली पाहिजे कारण विद्यार्थ्यांमध्ये दडलेले सुप्त गुण हे सादरीकरणाच्या माध्यमातून समाजमनावर दिसून येत असतात. प्रकल्प कदाचित छोटा असेल मात्र त्यातून मोठा संदेश जगाला मिळतो. या प्रकल्पांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर अशक्य असे काहीच नाही. या देशाला सुरवातीपासून अध्यात्माची परंपरा आहे आणि अध्यात्म हे विज्ञान आहे म्हणून विज्ञान ही जीवनाची गुरुकिल्ली बनली पाहिजे.’ असे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश नांगरे यांनी केले.
राज्य विज्ञान संस्था, रविनगर, नागपूर व शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यमिक) जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये आयोजिलेल्या ‘५३ व्या सोलापूर जिल्हा स्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनी २०२५-२६’ चे उदघाटन सोलापूर जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश नांगरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते मार्गदर्शन करत होते. स्वेरीचे सचिव डॉ. सुरज रोंगे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. दि.५ व दि.६ जानेवारी २०२६ या दोन दिवशी स्वेरीत सोलापूर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. दिपप्रज्वलनानंतर महाराष्ट्र राज्य विज्ञान महामंडळाचे संचालक लक्ष्मीप्रसाद मोहिते यांनी प्रास्तविकात ‘स्वेरीत आयोजिलेल्या या विज्ञान व गणित प्रदर्शनासंबंधी सविस्तर माहिती देवून वेळोवेळी विज्ञान प्रदर्शन भरविले पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढीस लागेल' असे सांगितले. स्वेरीने केलेल्या नियोजनाचे त्यांनी कौतुक केले. पंढरपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे म्हणाले की, ‘अपुऱ्या साधनामधूनही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून भविष्यात शास्त्रज्ञ तयार करावेत आणि या विद्यार्थ्यांमधूनच भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम, अंतराळकन्या सुनिता विल्यम्स व कल्पना चावला असे थोर शास्त्रज्ञ तयार होतील.’ उच्च माध्यमिकचे शिक्षण सहनिरीक्षक अनिल बनसोडे म्हणाले की, ‘विज्ञान अंगीकारण्यासाठी नैतिकता असावी लागते आणि नैतिकता असेल तर विज्ञानाचा वापर आपण सकारात्मक कार्यासाठी करू शकतो. कारण साध्या साध्या गोष्टीत मोठ्या गोष्टी दडलेल्या असतात.’ अध्यक्षस्थानावरून बोलताना स्वेरीचे सचिव डॉ.सुरज रोंगे म्हणाले की, ‘आपल्या कार्यात संयम, कष्ट आणि सातत्य ठेवल्यास पुढे व्हीआयटी, एनआयटी मधील विद्यार्थ्यांशी आपण स्पर्धा करू शकतो. स्पर्धेत प्रकल्प सादर करताना जिंकलो तर उत्तमच आहे पण त्यापेक्षाही स्पर्धेत सहभाग घेणे हे फार महत्वाचे आहे. त्यामुळे जीवनाला योग्य दिशा मिळते.’ या प्रदर्शनात प्रत्येक तालुक्यातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्या प्रकल्पांचा समावेश केला असून यातून विजेत्या होणाऱ्या तीन प्रकल्पांची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड होणार आहे. या प्रदर्शनात पहिल्या दिवशी सायंकाळपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून जवळपास १२४ प्रकल्पांची नोंद झाली असून आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉलला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यातून उत्कृष्ट प्रकल्पाचा नंबर काढण्यासाठी परीक्षकांना तारेवरची कसरत करावी लागणार, हे मात्र नक्की. प्रदर्शनासाठी बाहेरून आलेल्या विद्यार्थी व शिक्षकांसाठी नाश्ता, भोजन व निवासाची सोय उत्तमप्रकारे केल्याचे दिसून आले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू चव्हाण, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष व सहसमन्वयक संजय जवंजाळ, नीलकंठ लिंगे, वरिष्ठ लिपिक मनोज साबळे, विश्वास नागणे व विज्ञान मंडळाचे पदाधिकारी तसेच स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीचे कॅम्पस इनचार्ज डॉ. एम. एम. पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, प्रा. ए.एस. भातलवंडे आदी प्राध्यापक उपस्थित होते. उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश लटके यांनी केले तर आभार जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष व समन्वयक संजय भस्मे यांनी मानले. उद्या (दि.६ जानेवारी) रोजी समारोप असून यासाठी सोलापूर जिल्हापरीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम हे प्रमुख पाहुणे असणार आहेत.
Comments
Post a Comment