प्रा. अमितकुमार शेलार यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्धल त्यांचा सन्मान करताना दिग्नेशसिंग ठाकूर, सोबत डॉ.एस.टी. व्यवहारे, मुख्य मार्गदर्शक डॉ. बी. पी. रोंगे, डॉ.एस.एस. वांगीकर व डॉ. एस. आर. गवळी!
प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क (महाराष्ट्र)
पंढरपूर- शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग, माळेगांव बु. येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रा. अमितकुमार रामचंद्र शेलार यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर मार्फत मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) पंढरपूरचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शेलार यांनी पीएच.डी.अभ्यासक्रम पूर्ण केला. प्रा. अमित शेलार यांनी 'इन्वेस्टीगेटिंग द इफेक्ट ऑफ अल्टरिंग द कंपोझिशन ऑफ एच१३ स्टील बाय अडिशन ऑफ डिफरेन्ट ऑलॉयिंग एलेमेंट्स अँड ऑब्सेरविंग इट्स इफेक्ट्स ऑन मायक्रोस्ट्रुक्ट्रल इवोल्युशन अँड ऑन मेकॅनिकल प्रॉपर्टीएस’ या विषयावर सखोल संशोधन केले. या संशोधनामध्ये एच१३ स्टीलच्या रासायनिक संरचनेत विविध मिश्रधातु घटकांची भर घालून त्याचा सूक्ष्मरचनात्मक बदलावर व यांत्रिक गुणधर्मांवर होणारा परिणाम अभ्यासला आहे. उद्योग, मटेरियल सायन्स आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात महत्त्वपूर्ण उपयोगी ठरेल असे या संशोधनाचे परिणाम आहेत. या संशोधनासाठी प्रा. शेलार यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रयोग, विश्लेषण आणि निष्कर्षांची मांडणी करून प्रगत अभियांत्रिकी संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रा. अमित शेलार यांनी पीएच.डी. पदवी मिळविल्याबद्दल स्वेरी परिवार, पंढरपूरच्या वतीने तसेच माळेगांव महाविद्यालय संस्थेचे सचिव डॉ. डी. जी. ठोंबरे, विश्वस्त तसेच शिक्षक मंडळींच्या वतीने प्राचार्य डॉ. संदीप शहा यांनी डॉ. शेलार यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या संशोधनपर परंपरेत भर पडली असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.
Comments
Post a Comment